वेब सिरीजच्या माध्यमातून सैनिकांचा अवमान
यवत (प्रतिनिधी) – वेब सिरीजच्या माध्यमातून सैनिकांच्या पत्नींबद्दल तसेच सैनिकांच्या वर्दीची अवहेलना करणाऱ्या निर्माती एकता कपूर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून खुटबाव (ता. दौंड) येथे माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 7) निषेध करण्यात आला. सैनिकांच्या पत्नींबद्दल तसेच सैनिकांच्या वर्दीची यात अवहेलना केल्याने ही सिरीज बंद करण्याचीही मागणी अनेकांनी केली आहे.
एकता कपूर यांनी सुरु केलेल्या वेबसिरीजद्वारे भारतीय लष्कराच्या सैनिकांच्या पत्नींबद्दल विचित्र चित्रीकरण केले आहे. यामध्ये सैनिक कर्तव्य बजावण्यासाठी गेल्यानंतर त्याची पत्नी तिच्या मित्राला पतीची वर्दी परिधान करण्यास देते. त्यानंतर ती त्याला मारहाण करते. यात वर्दीचा आणि सैनिकांचाही अवमान असून सैनिक पत्नींच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडविले जात आहेत. परंतू, भारतीय सैनिक आणि यांच्या पत्नींबद्दल असे अपमानजनक चित्रण कदापि सहन केले जाणार नाही. यात सैनिकाची पत्नी, तिच्या आपल्या मित्राला पतीची वर्दी दिल्यानंतर ती फाडतानाचे चित्रण आहे.
या वर्दीसाठी सैनिकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. अशा चित्रणामुळे सैन्य दलात येण्यासाठी तरुण मुले धजावणार नाहीत. शिवाय, यातून सैन्याचाही अपमान होत आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून माहिती सेवाभावी संस्था, त्रिदल सैनिक सेवा संस्था, श्रीधर सेवा संघ भिमथडी माजी सैनिक यांच्या वतीने ऐकता कपूर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी माहिती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संदीप लगड, सुभाष यादव यासह नागरिक उपस्थित होते.