मांढर येथील 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
सासवड (प्रतिनिधी) : मांढर (ता. पुरंदर) येथील 70 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी (दि. 1) पहाटे मृत्यू झाला होता. ते शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना करोनाची लक्षणे दिसत असल्याने त्यांची करोनाची तपासणी करण्यात आली होती. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी (दि. 2) सकाळी त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यात करोनाचा पहिला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यांना यापूर्वी विविध आजार होते. त्यामुळे उपचारासाठी ते खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यावर खासगी रुग्णालयात विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये एचआरटीसी व सिटी स्कॅन करण्यात आल्याने यावेळी त्यांच्या छातीत कफ असल्याचे दिसून आले. त्यांची लक्षणे पाहता त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. त्यांची लक्षणे पाहता त्यांची करोना चाचणी घेण्यात आली. पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्याची तयारी चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या हाय रिस्क मधील 22 जणांना कोव्हीड सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. लो रिस्कमधील लोकांचा सर्वे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मांढर गाव प्रतिबंधित क्षेत्र, शिंदेवाडी आणि टोणपेवाडी बफर झोन जाहीर केला आहे.