आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
डोर्लेवाडी (प्रतिनिधी) : पिंपळी ( बारामती ) येथील छाया बाळासो वाघमोडे ( वय 50 ) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळफास घेतल्याची माहिती वाऱ्यागत पसरल्याने बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विपुल विभाते, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, राजेंद्र जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सोमवारी ( ता.१ ) सायंकाळच्या दरम्यान मृत महिला हातावर देवीची परडी घेऊन जोगवा मागण्यासाठी घराच्या बाहेर पडल्या होत्या मात्र रात्र झाली तरी त्या घरी न परतल्याने घरातील सदस्यांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. मंगळवारी ( ता.2 ) झारगडवाडी गावातील ( कालगांवकर वस्तीच्या चारीला ) एक शेतकरी शेतातील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेल्या नंतर त्यांना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला निदर्शनास आल्या.
परिसरात चौकशी केली असता मृत महिला ही पिंपळी येथील चौधरवस्ती येथील असल्याचे स्पष्ट झाले. मृत महिलेचे धीर हनुमंत भानुदास वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बारामती तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र जाधव करीत आहेत.