पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यातील चिंचपूरपांगूळ येथील गरोदर महिलेला जिल्हा रुग्णालयाकडून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पाथर्डी तालुका आता पुन्हा कोरोना मुक्त झाला असून, सध्या पाथर्डी तालुक्यात एकही करोना रुग्ण नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली. दरम्यान, निपाणी जळगाव येथील एक अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे.
तालुक्यातील चिंचपूरपांगूळ येथे मागील काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या 22 वर्षीय गरोदर महिलेला करोनाची बाधा झाली होती. सदरील महिलेला तिचा पती व भाऊ हे मुंबईहून घेऊन चिंचपूरपांगूळ येथे आले होते. संबंधित महिला पॉझिटिव्ह निघाल्यानंतर महिलेच्या आई-वडिलांची तसेच महिलेच्या भावाची देखील तपासणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
संबंधित महिलेवर नगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. तिचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, तालुक्यातील निपाणी जळगाव येथील एका इसमाचा स्त्राव तपासणीसाठी देण्यात आला होता. त्याचा अहवाल देखील शनिवारी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुका आता पूर्णपणे करोनामुक्त झाला असल्याची माहिती डॉ. भगवान दराडे यांनी दिली.