महाबळेश्वर (प्रतिनिधी) -करोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या संशयिताने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली. आत्महत्या केलेला इसम हा करोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला करोना केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. त्याला दारूचे व्यसन होते, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी संगीता राजापुरकर यांनी रविवारी घटनास्थळाला भेट देवून पाहणी करुन खबरदारी घेण्यासंदर्भात सुचना केल्या.
महाबळेश्वर शहर हे करोना मुक्त असले तरी तालुक्याच्या ग्रामीण भागात मुंबईवरून आलेल्या काही लोकांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस येत आहे. आजअखेर मुंबई वरून आलेल्या 18 लोकांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये गारोशी गावातील एकाचा समावेश आहे. रविवारी आत्महत्या केलेला संशयित हा गारोशी येथील करोनाबाधितासोबतच मुंबईवरुन गावी आला होता. त्यामुळे त्याला करोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र रविवारी सकाळीचे या करोना संशयित इसमाने वॉश बेसिनच्या नळाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी करोना केअर सेंटर व परिसरातील सर्व भाग सिल केला असून परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.
या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी संगिता राजापुरकर यांनी घटना स्थळी भेट दिली. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, तालुका वैद्यकिय अधिकारी अजय कदम, पालिका मुख्याधिकारी अमिता दडगे-पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.