आणखी अठरा जणांना “करोना’ची लागण : 38 रुग्णांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज आणखी 18 जणांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये शहरातील 15 तर शहराबाहेरील 3 जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आकडा पाचशेच्या पार गेला आहे. शहरात आजपर्यंत 511 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आज एकाच दिवशी तब्बल 38 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील बौद्धनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाईनगर, नेहरुनगर, दापोडी येथील 15 जणांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये 11 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. पुणे ग्रामीणमधील चिंचोली, परंदवाडी, पाईट येथील एक पुरुष व दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने पाचशेचा आकडा पार केला आहे. शहरातील रुग्णसंख्या 511 वर पोहचली असून सक्रिय रुग्णांची संख्या 265 झाली आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरातील 38 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 249 करोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. आज डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे संभाजीनगर, आळंदीरोड, आनंदनगर, बौद्धनगर, रुपीनगर व वाकड येथील रहिवाशी आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान आज दिवसभरात 112 नवीन संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसांतील 259 जणांचे तपासणी अहवाल येणे अद्याप बाकी आहे.