चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील क्वारंटाइन सेंटरमधील 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या क्वारंटाइन केंद्रातील एका खोलीत मजुराने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तर दुसऱ्या व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मिथुन सरकार असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.
गळफास घेऊन आत्महत्या केलेला मजूर हा 7 दिवसांपूर्वी नागपूरहून आला होता. हा मजूर मूळचा शामनगर येथील रहिवासी होता. तर ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष निकोडे असे आहे. हा व्यक्ती सात दिवसांपासून क्वारंटाइन केंद्रात दाखल होता. हा व्यक्ती मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आहे.
या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ आरोग्य यंत्रणा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. आत्महत्या केलेल्या मिथुन सरकारच्या खोलीत पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच आत्महत्येमागचे कारण अद्याप पोलिसांना समजले नसून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 22 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 12 रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या 10 करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.