वाल्हे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक लग्न सोहळे अत्यंत साध्या पद्धतीने पार पडत आहेत. असाच एक विवाह सोहळा दोन दिवसापूर्वी पार पडला असून, वाल्हे (ता.पुरंदर) येथील पंढरीनाथ भुजबळ यांचा मुलगा संदेश भुजबळ व रानमळा (ता.पुरंदर) येथील प्रकाश कुदळे यांची मुलगी ज्योती कुदळे यांचा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने संपन्न झाला.
यावेळी सोहळ्याच्या खर्चातुन सामाजिक बांधलकी जपत या नवदांपत्याने वाल्हे व जेजुरी परिसरातील वन्यप्राण्यांसाठी वनविभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या पाणवठ्यामध्ये
पाण्याचे टँकर देऊन भावी वैवाहिक जीवनासाठी जणू वन्य जीवांचा आशिर्वादच घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तोंडाला मास्क बांधुन सोशल डिस्टन्सिंग पाळत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रानमळा (ता.पुरंदर) येथे संपन्न झालेल्या या विवाहावेळी नवदापत्यांनी सोहळ्याचा खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जपत वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा निर्णय घेत वाचवलेली रक्कम नव दांपत्यांच्या हस्ते जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
ती रक्कम जेजुरीच्या जयमल्हार फाऊंडेशनचे प्राणी मित्र विशाल बारभाई यांच्याकडे वाल्हे व जेजुरी परिसरातील वन्यप्राण्यासाठीच्या पाणवठ्यामध्ये पाणी देण्यासाठी खर्च करण्यास दिली जाणार असल्याची माहिती माने यांनी यावेळी दिली.