दौंडकरांनी टाकला सुटकेचा निःश्वास
दौंड(प्रतिनिधी) – दौंड शहरातील आजी-आजोबांसह नातीने करोनावर मात केली आहे. ही वार्ता कानी पडताच दौंडकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
दौंड शहरामध्ये सापडलेल्या पहिल्या 82 वर्षीय आजोबांनी करोनाला हरवले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांची पत्नी व नात देखील करोनामुक्त झाली आहे, अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
दौंड येथे 16 मे रोजी पहिला 82 वर्षीय करोना बाधित रुग्ण आढळून आला होता. या आजोबांवर पुण्यात उपचार सुरु होते. या आजोबांनी करोनाचा यशस्वी सामना करत करोनाला हरवले आहे. या आजोबांच्या संपर्कात आलेली त्यांची पत्नी (वय 75) व नात (वय 20) या देखील कोरोना बाधित झाल्या असल्याचे 19 मे रोजी निदर्शनास आले होते. त्यांच्यावर दौंड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु होते. त्यांनी देखील करोनावर मात केली आहे.
या तिन्ही रुग्णांनी करोनावर मात केली असली तरी त्यांना 14 दिवस घरात विलीगीकरण करण्यात येणार आहे. शहरामध्ये अनेक अफवांना पेव फुटत असून या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन डॉ. संग्राम डांगे यांनी केले आहे.