आंबेठाण -एसी सुरू करण्याच्या प्रयत्नात झालेल्या शोर्टसर्किटमुळे कपड्याच्या गोदामाला भीषण आग लागून महागडे कपडे व मुद्देमाल जळून खाक झाल्याने सुमारे 30 ते 35 लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण येथील शुभमंगल प्लाझाच्या भव्य इमारतीमध्ये सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली आहे. चाकण एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
चाकण येथील उद्योजक भगवान मेदनकर (वय 43) यांचे चाकण येथील तळेगाव चौकातील शुभमंगल प्लाझाच्या भव्य इमारतीमध्ये कार्यालय आहे. या कपड्याच्या गोदामालगत बॅंका, एटीएम, पतसंस्था, शासकीय व निशासकीय कार्यालये, हॉटेल्स, दुकाने आहेत. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.