टोकियो – करोनाच्या संकटामुळे यंदा होणारी ऑलिम्पिक स्पर्धा आता पुढील वर्षी होणार आहे. मात्र, करोनाचा धोका कायम राहिला व त्यामुळे स्पर्धेचे आर्थिक नियोजन बिघडले तर त्यावेळी देखील स्पर्धा होऊ शकत नाही. मग अशा स्थितीत ही स्पर्धा रद्दच करावी लागेल, अशी भीती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी व्यक्त केली आहे.
ही स्पर्धा यंदा 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने स्पर्धा एक वर्षाने पुढे ढकलण्यात आली. नव्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा आता 2021 साली 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. सध्या करोनाचा वाढता प्रसार पाहता ही स्पर्धा नव्या नियोजनानुसार तरी होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जपानच्या टोकियो शहराला या स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाल्यापासून अत्यंत जोरदार तयारी सुरू झाली व ते काम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार होते. त्याचवेळी संपूर्ण जगात करोनाचा हाहाकार झाला व खेळाडूंच्या देशवासीयांच्या आयोग्याच्या काळजीमुळे ही ऑलिम्पिक स्पर्धाच नव्हे तर जागतिक स्तरावरील अनेक स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. ऑलिम्पिकच्या तारखांत देखील बदल झाले. आता स्पर्धा नव्याने आयोजित करताना पुन्हा एकदा प्रचंड खर्च होणार आहे.
हा भार जपान सरकार व जपान ऑलिम्पिक संघटनेला उचलणे शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे पूर्वी करारबद्ध करण्यात आलेले प्रायोजक पुन्हा पुढे येणार का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्पर्धेची तयारी, सुविधांची निर्मिती व जपणूक यांसाठी पुन्हा एकदा वाढीव खर्च करणे आयोजकांना कसे शक्य होईल. त्यातच करोनाचा धोका पुढील वर्षीही कायम राहिला तर त्यावेळी देखील स्पर्धेचे आयोजन करता आले नाही तर ही स्पर्धाच पूर्णपणे रद्द करावी लागेल, असेही बाख यांनी सांगितले.