महापालिका आयुक्‍तांच्या कारभारावर टीकेची झोड

श्रावण हर्डीकर यांना करोनाशी मुकाबला करताना नाकीनऊ


आयुक्‍त भाजप पदाधिकाऱ्यांचे हितसंबध जोपासण्यात गुंग


प्रशासनावर नसलेला वचक, वैद्यकीय ज्ञानाचा अभाव

पिंपरी – प्रशासनावर नसलेला वचक, वैद्यकीय ज्ञानाचा अभाव, अधिकाऱ्यांमधील बेबनाव, खरेदीमधील भ्रष्टाचार यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना करोनाशी मुकाबला करताना नाकीनऊ आले आहे.

शहरात करोनाचा कहर वाढला आहे. आजपर्यंत 242 जणांना करोनाची लागण झाली आहे, तर झोपडपट्टी भागातही करोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. मात्र आयुक्‍त केवळ सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचे हितसंबध जोपासण्यात, मोठ्या रकमेची टेंडर मार्गी लावण्यात आणि थेट पद्धतीने खरेदी करण्यात गुंग असल्याने आयुक्तांचा एकूण कारभार संशयाच्या वातावरणात भरकटल्याचे पालिका वर्तुळात पहावयास मिळत आहे.

आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. त्यातच करोनाचे संकट हाताळण्यात त्यांना आलेल्या अपयशामुळेही राज्य सरकार त्यांच्यावर नाराज असल्याची वदंता आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रकोप सुरू आहे. ही परिस्थिती हाताळण्याकामी आयुक्‍त म्हणून श्रावण हर्डीकर यांची कसोटी लागली. मात्र, त्यात ते अयशस्वी ठरले. प्रशासनावर नसलेला वचक, वैद्यकीय ज्ञानाचा अभाव, अधिकाऱ्यांमधील बेबनाव, यामुळे हर्डिकरांना करोनाशी मुकाबला करताना नाकीनऊ आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच, सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांचे हितसंबध जोपासण्यातच अधिकचा वेळ गेल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

दोन दिवसांपूर्वी आनंदनगरमध्ये 30 हून अधिक करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हा परिसर महापालिकेच्या वतीने सील करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने या भागातील सर्व दुकाने प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहेत.

मात्र परिसर सील करताना कोणत्याही उपाययोजना न केल्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती अटोक्‍यात आणताना आयुक्‍तांचा अक्षरश: कस लागला होता. हे आंदोलन शमविण्यासाठी आयुक्तांना स्वत: मैदानात उतरून नागरिकांशी चर्चा करावी लागली होती. अशीच परिस्थिती शहरातील अनेक परिसरात उद्‌भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

थेट खरेदीमुळे आयुक्‍त रडारवर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी गेली दोन महिने महापालिका प्रशासन आणि भांडार विभागाकडून अक्षरश: लूट चालवली आहे. मात्र यावर आयुक्‍तांचा कोणताही वचक नाही. करोनामुळे सध्या 33 टक्‍केच अंदाजपत्रकातील रक्‍कम खर्च करण्याचे शासनाचे आदेश असताना कोट्यवधींची बिनबोभाट खरेदी सुरू आहे. मात्र आयुक्‍त याबाबत बोलायची तयारी दाखवत नाहीत. यामुळे आयुक्‍त विरोधकांच्या रडारवर आले आहेत.

आयुक्‍तांच्या मनमानीची पालकमंत्र्यांकडे तक्रार
पिंपरी-चिंचवड महापालिकेने करोनाची साथ रोखण्यासाठी केलेल्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करीत या खरेदीबाबत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून सर्व माहिती मागितली आहे. मात्र ती देण्यास वारंवार टाळाटाळ होत असून, याची तक्रार उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे साने यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.