शिक्रापूर -देशभरात करोनाचे भयानक संकट उभे राहिलेले असताना शिक्रापुरात काही राजकीय नेत्यांनी मैं “मैं हूँ डॉन’… हे गाणे गायले त्यावर अनेक जण थिरकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात करोनाच्या पार्श्वभूमीवरल सर्व नियम पायदळी तुडवले गेल्याचे सिद्ध झाल्याने तीन मातब्बर नेत्यांसह सात ते आठ जणांवर शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी उपाध्यक्ष मंगलदास बांदल (रा. शिक्रापूर ता. शिरूर), भारतीय जनता पार्टीचे नेते संदीप भोंडवे (रा. लोणीकंद, ता. हवेली), शिक्रापूरचे माजी सरपंच संजय जगताप (रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर शिक्रापूर ठाण्याचे पोलीस नाईक ब्रह्मा पोवार यांनी फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर येथे मंगलदास बांदल हे माईक घेऊन “मैं हूँ डॉन’ हे हिंदी गाणे गात होते तर भोंडवे व जगताप हातवारे करून त्यांना साथ देत होते. तर त्या ठिकाणी जमलेल्या काही लोकांनी तोंडावर लावण्याचा मास्क गळ्यात अडकविलेला होता. तर संचारबंदी असतानाही पाचपेक्षा अधिक नागरिक त्या ठिकाणी होते तर त्यांनी सोशल डिस्टन्सिंगही पाळली नव्हती, असा व्हिडिओ बाबू पाटील ढमढेरे यांच्या फेसबुक पेजवर व्हायरल झाल्याने त्या आधारावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.
अतिउत्साह अंगलट
मंगलदास बांदल यांचे कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या त्यांच्यात एका अति उत्साही कार्यकर्त्याने बांदल हे गात असलेले गाणे अति उत्साहीपणाने सोशल मीडियावर प्रसारित केले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडल्याने कार्यकर्त्याचा अति उत्साहीपणा अंगलट आल्याचा प्रकार घडला आहे.