पुणे –जिल्हा परिषदेमध्ये मागील काही दिवसांपासून विविध विभागांमध्ये ठेकेदार, पुरवठादारांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये करोना संसर्गाची भीती वाढली आहे. यावर प्रशासनाने काही दिवस उशिरा का होईना, पण फतवा काढत ठेकेदार, कंत्राटदार, पुरवठादारांना मुख्यालयात प्रवेश बंदी केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने मुख्यालय बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी केली होती. प्रवेशद्वारजवळ आवक-जावकसाठी एक कक्ष देखील सुरू केला. पूर्वी मोजक्याच महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी करून आत प्रवेश दिला जात होता. तर तालुक्याहून टपाल घेऊन आलेल्यांकडून प्रवेशद्वाराजवळ जमा करून घेतले जात होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत होते.
प्रवेशद्वारातून थेट मुख्यालयात अनेक ठेकेदार, पुरवठादारांची दररोज ये-जा वाढली. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत आदेश काढला आहे. ठेकेदार, कंत्राटदार, पुरवठादार यांना कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद मुख्यालयात प्रवेश देऊ नये, त्यांना कार्यालयात बोलवू नये, अशा सक्त सूचना सीईओंनी दिल्या आहेत. कोणत्याही ठेकदारांना मोजणी पुस्तिका, रेकॉर्ड, देयके जमा करण्याचे असल्यास प्रवेशद्वारजवळील कक्षात जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत.