नेवासे -तालुक्यातील नजीक चिंचोली येथील विजय अमृतलाल मुनोत यांच्या आनंद किराणा माल व कापडाच्या दुकानाला आज दुपारी 2:15 वाजता विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज नजीक चिंचोली येथे सोसायटी कार्यालयाशेजारी विजय अमृतलाल मुनोत यांचे आनंद किरणामाल व कापडाचे दुकान आहे. शनिवारी दुपारी दुकान बंद करून ते भेंडा येथे गेले असता दुपारी 2:15 वाजता त्यांच्या बंद असलेल्या किराणा दुकानामधून धूर येत असल्याचे गावातील व दुकानाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी मुनोत यांना भ्रमणध्वनी वरून घटनेची सूचना दिली. परंतु ते भेंडा येथे असल्याने त्यांना येण्यास वेळ होणार हे जाणून ग्रामस्थांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला आणि आग आटोक्यात आणली.
या आगीत दुकानातील एकूण मालापैकी 25 ते 30 टक्के माल जळून खाक झाला. जळालेल्या मालामध्ये रोख रक्कम व मालाचा समावेश आहे. वीज वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी आज सकाळपासून वीज उपकेंद्रातूनच बंद असलेला विदुयत पूरवठा अचानक सुरू झाल्याने मुनोत यांच्या दुकानात विजेचे शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचे सांगितले गेले. या आगीत मुनोत यांचे सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सरपंच अनिता पाठक, यांनी भेट देऊन पाहणी केली.