जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊल
पुणे – लॉकडाऊनमुळे अडकलेले स्थलांतरित मजूर व इतर नागरिक पुणे जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे करोनाचे संशयित रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. त्यातून संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण आणि उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या सर्व प्रवाशांची तालुक्यांच्या अथवा गावांच्या सीमेवर वैद्यकीय तपासणी अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत प्रवास करून आलेल्या नागरिकांची स्वतंत्र नोंद ठेवावी. या नागरिकांची माहिती दररोज तालुक्यातील आरोग्य विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावी. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांवर करोनासंदर्भात जबाबदारी देण्यात आलेली आहे. तरी आदेशाची सर्व विभागांच्या संयुक्त पथकामार्फत काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
प्रवास करुन आलेला कोणताही प्रवासी चेक पोस्टवर नोंदणीशिवाय प्रवेश करणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्व संबंधित यंत्रणा अधिकारी यांनी देण्यात आलेल्या जबाबदारीनुसार कार्यवाही करावी. मनुष्यबळ व साधन सामग्रीचा जबाबदारीच्या अनुषंगाने आवश्यक वापर करुन त्यांना सोपवलेली जबाबदार पार पाडावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
‘राम’वाक्य…
– जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांनी तालुका-गावाच्या सीमेवर चेकपोस्ट तयार करावे.
– आलेल्या नागरिकांची तेथे संयुक्त पथकामार्फत तपासणी करावी. तपासणीदरम्यान करोनाची लक्षणे नसल्यास संबंधितांच्या हातावर शिक्का मारुन त्यांना होम क्वॉरंटाइन करावे.
– कौटुंबिक कारणाने होम क्वॉरंटाइन शक्य नसल्यास अशांना संस्थात्मक क्वारंटाइन करावे.
– करोनाची लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयात पाठवावे.
– प्रवास करून आलेल्या सर्व नागरिकांना विलगीकरणादरम्यान आरोग्यविषयक सर्व काळजी घेण्याबाबतच्या सूचना द्याव्यात.