बोपखेल फाटा येथील घटना : पोलीस वाहनाचीही केली तोडफोड
पिंपरी – नाकाबंदीच्या ठिकाणी मोटार थांबविल्यामुळे एका इसमाने पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच पोलीस आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 10) सायंकाळी सव्वापाच वाजता गणेश नगर, बोपखेल फाटा येथे घडली.
महेंद्र रवींद्र वाघमारे (वय 45, रा. रामनगर, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय व्यंकटेश कामठे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरात 80 नाकाबंदी केली आहे. करोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रशासन सर्व प्रकारे खबरदारी घेत आहे. फिर्यादी पोलीस हवालदार कामठे हे बोपखेल फाटा नाकाबंदीच्या ठिकाणी रविवारी कार्यरत होते. रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. आरोपी त्याच्या मोटारीतून जात असताना कामठे यांनी आरोपीची मोटार नाकाबंदीच्या ठिकाणी थांबवली.
मोटार थांबवल्याचा राग आल्याने आरोपीने पोलीस कर्मचारी कामठे यांच्या कानशिलात लगावली व त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारला. आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली.
पोलीस करत असलेल्या सरकारी कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. त्यामुळे दिघी पोलीस आरोपीला त्यांच्या व्हॅनमधून दिघी पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोक्याने धडक मारून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.