पारनेर -लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांना परजिल्ह्यात, परराज्यात प्रवास करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी तातडीने प्रवास करणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली एसटी बस रविवारी मध्यरात्री दीड वाजता पारनेर आगारातून मजुरांना घेवून धावली.
तात्काळ वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्याबरोबरच संबंधित मजुरांना प्रवासासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता आ. लंके यांच्या संपर्क कार्यालयातून ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. मजुरांच्या रवानगी संदर्भातील सर्व सोपस्कार वेळीपूर्वीच पूर्ण केल्यानंतर मजुरांना सोडण्यासाठी बस धावली. रविवारी दिवसभर उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यासह राज्याच्या विविध भागांतील मजूर रवाना करण्यात आले. दरम्यान शनिवारी काही मजूर खासगी वाहनाने पाठविण्याची व्यवस्था आ. लंके यांनी केली होती.
आ. लंके यांनी गेली दीड महिना बाहेरच्या मजुरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शेकडो मजुरांनी लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांच्या डोळयांत अश्रू उभे राहिले. अडचणीच्या काळात आमदार साहेबांच्या रूपाने देव भेटल्याचा भावुक प्रतिक्रिया मजुरांनी दिल्या.
यावेळी आ. निलेश लंके, तहसीलदार ज्योती देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी प्रकाश लाळगे, आगारप्रमुख पराग भोपळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी आदी उपस्थित होते. आ.लंके यांच्याकडून बिस्किटे, पाणी बाटल्याचे वाटप करण्यात आले.
नीलेश भय्या राखी के लिये जरूर आना!
उत्तरप्रदेशातील तनुजा या महिलेच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा महिलांनी बसमध्ये बसण्यापूर्वी आ. लंके यांची भेट घेत अक्षरशः हंबरडा फोडला. नीलेश भैय्या आपने हमारी बडी सेवा की है. अभी हम महाराष्ट्रा मे वापस नही आ सकते, आनेवले राखी को हमारे घर जरूर आना, हम तुम्हारा इंतजार करेंगे’ अशी विनवणी केली. त्यामुळे आ.लंके यांनी अश्रूंना मोकळी वाट करून देत त्यांच्या आमंत्रणाचा नम्रपणे स्वीकार केला.