नवी दिल्ली – लॉक डाऊन असूनही सिमेंट आणि पोलाद कंपन्यांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या उत्पादनाच्या दरांमध्ये साखळी करून 40 ते 50 टक्क्यापर्यंत वाढ केल्याचा आरोप विकासकांची संघटना असलेल्या क्रेडाईने केला आहे.
यासंदर्भात घरबांधणी आणि शहर व्यवहार मंत्री हरदिप सिंग पुरी यांना पत्र पाठवून यात ताबडतोब हस्तक्षेप करण्याची मागणी क्रेडाईने केली आहे. सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सिमेंट व पोलाद कंपन्या दरवाढ करीत आहेत.
काही राज्यांमध्ये सिमेंटचे दर प्रति बागेला 100 ते 250 रुपयांनी वाढले आहेत. तर पोलादाचे दर प्रति टनाला 2 हजार ते अडीच हजार रुपयांपर्यंत वाढले आहेत. केंद्र सरकारने काही भागात बांधकामाला परवानगी दिली असतानाच सिमेंट आणि पोलाद कंपन्यांनी याचा गैरफायदा घेण्यासाठी दरवाढ केली असल्याचे क्रेडाईने म्हटले आहे.
अशा प्रकारचे आरोप क्रेडाईने याअगोदर वेळोवेळी केलेले आहेत. त्याचबरोबर स्पर्धा आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केलेली होती. अगोदरच रिऍल्टी क्षेत्र अडचणीत असताना या कंपन्यानी दरवाढ केल्यामुळे रिऍल्टीवर मोठा परिणाम होणार आहे व प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे.
अशा अवस्थेत अनेक विकासक एकतर काम थांबवतील किंवा प्रकल्प पुढे ढकलतील. त्याचबरोबर सिमेंट आणि पोलादाची दरवाढ झाली की त्यापुढे घरांचे दर वाढणार असतात. ही दरवाढ अनैतिक आहे त्याचबरोबर स्पर्धेच्या नियमात बसणारी नाही या पत्रात म्हटले आहे.