नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लॉन्डरिंगप्रकरणी प्रतिबंधात्मक उपाययोजना
नवी दिल्ली – मुंबईतील बांद्रा भागातील असोसिएट जर्नल्स लिमिटेडच्या मालकीच्या 9 मजली इमारतीतील काही भाग सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या तपासप्रकरणी जप्त केला आहे. ही कारवाई आपण मनी लॉन्डरिंग विरोधी कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून करत असल्याचे ईडीने म्हटले आहे. या संदर्भात असोसिएट जर्नल्स लिमिटेड आणि संस्थेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांना नोटीसही बजावण्यात आली असल्याचे ईडीने म्हटले आहे.
असोसिएट जर्नल्स लिमिटेडवर गांधी कुटुंबीयांसह कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे नियंत्रण आहे. या समुहाच्या वतीने नॅशनल हेरॉल्ड हे वर्तमानपत्र चालवले जाते. या 9 मजली इमारतीला दोन तळघरे आणि एकूण 15 हजार चौरस मीटरचे बांधकाम असून इमारतीची एकूण किंमत 120 कोटी रुपये आहे. बांद्रा पूर्व येथील ही इमारत काला नगर भागात सर्व्हे क्रमांक 341 वरील प्लॉट नं 2 वर उभारण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भूपिंदर सिंह हुडा आणि मोतीलाल व्होरा यांनी मिळून पंचकुलामध्ये असोसिएट जर्नल्ससाठी बेकायदेशीरपणे भूखंड मिळवला. त्यानंतर त्याच्या आधारे बांद्रा येथे ही इमारत बांधण्यासाठी दिल्लीतील सिंडेकेट बॅंकेतून कर्ज मिळवले. त्यामुळे मुंबईत उभारलेल्या या इमारतीतील 16.38 कोटी रुपयांच्या किमतीचा भाग ताब्यात घेण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, असेही ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंचकुला प्लॉट आधीपासूनच ईडीने ताब्यात केला असून, हुडा व व्होरा यांच्याकडे त्यासंदर्भात चौकशी केली आहे. हा भूखंड हरियाणा सरकारने सर्वप्रथम 1982 साली असोसिएट जर्नल्ससाठी उपलब्ध करून दिला होता. मात्र, भूखंड उपलब्ध करून देण्याचे नियम न पाळल्याने 1992 साली हा भूखंड हरियाणा सरकारला परत करावा लागला होता. मात्र, हरियाणा शहरी विकास प्राधिकरणाने नियम डावलून हा भूखंड पुन्हा “एजेएल’ला उपलब्ध करून दिला होता. भूखंडाची किंमत 64.93 कोटी रुपये असताना त्यासाठी केवळ 59,39,200 रुपये आकारण्यात आले होते.