लखनौ -कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांनी शुक्रवारी उत्तरप्रदेशला एक लाख मास्क पाठवले. त्या मास्कचे वाटप प्रामुख्याने करोनाचा फैलाव अधिक असणाऱ्या रेड झोनमधील गरजूंमध्ये केले जाईल. कॉंग्रेसच्या उत्तरप्रदेश प्रभारी असणाऱ्या प्रियांका यांनी याआधी त्या राज्यात अन्नधान्य पाठवले होते.
प्रियांका यांचे बंधू आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही याआधी उत्तरप्रदेशला स्वतंत्रपणे अन्नधान्ये पाठवली. करोनामुळे निर्माण झालेली स्थिती हाताळण्यावरून कॉंग्रेसकडून सातत्याने मोदी सरकारवर टीका केली जात आहे. त्याचवेळी कॉंग्रेसकडून जनतेला मदतीचा हातही दिला जात आहे. पक्षाने आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गरजूंना सर्वतोपरी मदत करण्यास सांगितले आहे. त्या मदतीसाठी राहुल आणि प्रियांकाही पुढे सरसावल्याचे दिसते.