नवी दिल्ली – सोशल मीडियाचा चुकीचा वापर झाल्याने अनेक गुन्हे घडल्याचे नेहमीच बातम्या येत असतात. असाच एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर एक इन्स्टाग्राम चॅट व्हायरल होत असून यामध्ये काही शाळकरी मुले सामूहिक बलात्काराचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलीस अधिक तपास करत असून २०पेक्षा अधिक अल्पवयीन मुलांची ओळख पटली आहे.
‘बॉईज लॉकर रूम’ या इंस्टाग्राम ग्रुपमध्ये शाळकरी मुले होती. यामध्ये एका मुलगा मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यासाठी इतरांना भडकवत असल्याचे दिसत आहे. या ग्रुप चॅटचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर लीक झाले. यावर लोकांनी सोशल मीडियावर या ग्रुपविरूद्ध लिखाण सुरू केलं आणि ट्विटरवर #boyslockerroom ट्रेंड करत आहे. कडक कारवाई करण्याची मागणी नेटकरी करीत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणावरही गुन्हा दाखल केला नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून २० पेक्षा अधिक मुलांची ओळख पटली असल्याचे सांगितले आहे.