एकाच उपाययोजनेतून सापडले तब्बल 80 टक्के रुग्ण : महापालिका प्रशासनाची माहिती
रुग्णांच्या विश्लेषणातून समोर आली माहिती
परदेशी नागरिकांच्या ट्रेसिंगमध्ये 19 रुग्ण सापडले
पुणे – थैमान घालणाऱ्या करोनाला रोखण्यासाठी “फिजिकल डिस्टंसिंग’ आणि संसर्ग झालेल्या रुग्णांचे “कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ हे पर्याय आहेत. त्यामुळे शहरात पहिला रुग्ण सापडल्यापासून वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांचे ट्रेसिंग करण्यात येत आहे. यातून सुमारे 80 टक्के करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे या साथीला काही प्रमाणात अटकाव घालण्यात महापालिकेस यश आल्याचे चित्र आहे. या रुग्णांच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे.
शहरात पहिला करोनाबाधित व्यक्ती आढळल्यानंतर महापालिकेने वेगवेगळ्या माध्यमांतून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग केले. त्यात, पालिकेची फ्लू क्लिनिक, रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या थेट संपर्कात आलेल्या जवळील व्यक्ती, लागण झालेल्या रुग्णाच्या परिसरातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, महापालिकेची मोबाइल रुग्णालये, तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांशी दैनंदिन संपर्क या माध्यमातून पालिकेकडून हे ट्रेसिंग केले जात आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिलपर्यंत पालिकेने केलेल्या ट्रेसिंगमध्ये सर्वाधिक 642 रुग्ण लागण झालेल्या व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या सापडले आहे. तर, महापालिकेने घरोघरी केलेल्या सर्वेक्षणातून 390 रुग्ण सापडले आहेत. पालिका आणि स्वयंसेवी संस्थेच्या मोबाइल दवाखाना तपासणीत 170 रुग्ण आढळले आहेत. तर परदेशी नागरिकांच्या ट्रेसिंगमध्ये 19 रुग्ण सापडले असून पालिकेच्या फ्लू क्लिनिकमध्ये आतापर्यंत 5 करोनाबाधित आढळून आले आहेत.
तब्बल 2 हजार कर्मचारी ट्रेसिंगच्या कामात
या ट्रेसिंगच्या कामासाठी महापालिकेने आतापर्यंत जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांची फौज उभी केली आहे. त्यात घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणे आणि रुग्णाच्या संपर्कातील भागाचे सर्व्हेक्षण यासाठी सर्वाधिक 1,500 कर्मचारी कार्यरत आहेत. तर फ्लू क्लिनिक, मोबाइल तपासणी क्लिनिक, यासह पालिकेच्या रुग्णालयामध्ये जवळपास 500 च्या आसपास डॉक्टर तसेच नर्सेसचा स्टाफ शहरात कार्यरत आहेत. त्याच्या माध्यमातून हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.