कर्जत -करोनाविरुद्धच्या लढ्यात मोठ्या धैर्याने आणि जीव धोक्यात घालत सुरू असलेली बीव्हीजीची 108 सेवा अग्रणी आहे. करोनाचे संशयित रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्याचे काम हे कर्मचारी मोठ्या जिकिरीने करत आहेत.कर्जत येथे शहरासह राशीन, मिरजगाव या ठिकाणाहून 108 च्या गाड्या रुग्णांना ताबडतोब उपचारासाठी नेत आहेत. त्यांचे हे काम रुग्णांसाठी जीवनदायी ठरत आहे.
या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक किट, मास्क, हॅंडग्लोज, सॅनिटीझर हे सर्व उपलब्ध करून दिलेले आहे. तहसीलदार सी. एम. वाघ, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, बी. व्ही. जी. सुपरवायझर कपिल यादव यांची मोलाची मदत मिळत आहे. उपजिल्हा रुग्णालय, नगरपंचायत यांच्यावतीने जंतुनाशक फवारले जात आहे.
उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब कंकराळे, कांचन बिडवे, संजय थोरात, कपिल यादव यांचे हे संपर्कात राहून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत.108 ही रुग्णवाहिका सेवा बीव्हीजी इंडिया लिमिटेडतर्फे चालविण्यात येते. महाराष्ट्रात 937 रुग्णवाहिका आहेत. प्रत्येक शहरात काही रुग्णवाहिका करोना निर्मूलन मोहिमेसाठी नेमण्यात आल्या आहेत. बाधित तसेच उपचारानंतर बरे झालेले रुग्ण यांची ने आण करण्यासाठीच्या सेवा या रुग्णवाहिका बजावत आहेत.