नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा महान खेळाडू आहे. त्याच्यासारखे यष्टिरक्षण माझ्याकडून होणार नाही. तो केवळ यष्टिरक्षकच नव्हे तर फलंदाजम्हणूनही महान आहे. त्याच्याशी माझी तुलना करु नका तो फर्स्ट चॉइस आहे तर मी केवळ पर्याय आहे, असे मत भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याने व्यक्त केले आहे.
एक यष्टिरक्षक, खेळाडू तसेच कर्णधार म्हणून धोनीचे योगदान इतके मोठे आहे की आज देशातील प्रत्येक खेळाडूला त्याच्यापासून प्रेरणा मिळत आहे. त्याच्यासारखी कामगिरी व्हावी असे मलाही वाटते मात्र ते शक्य नाही असे माझे मनच मला सांगते. तुलना दोन खेळाडूंची होते. महान आणि सामान्य यांच्यात तुलना करायची नसते. धोनीचा वारसदार मिळणे खूप कठीण आहे. यष्टिरक्षण करण्याची अतिरीक्त जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली असली तरीही हजारो चाहत्यांसमोर यष्टिरक्षण करणे सोपे नाही. आपली एक चूक संघाला महागात पडू शकते याचीही मला कल्पना आहे, असेही राहुल म्हणाला.
गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर धोनीने क्रिकेटपासून जवळपास 8 महिने विश्रांती घेतली. या काळात भारतीय संघाने ऋृषभ पंत, संजु सॅमसन असे कितीतरी यष्टिरक्षक फलंदाज खेळविले मात्र, त्यांच्याकडून सुमार कामगिरी झाल्याने कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी माझ्याशी चर्चा करुन माझ्यावर यष्टिरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली. ही कामगिरी चांगली होत असली तरी लगेच धोऩीशी माझी तुलना होत असून ती योग्य नाही, असेही राहुलने स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत यष्टिरक्षण करताना माझ्यावर खूप दडपण आले होते. माझी जर एक चूक झाली असती तर माझ्यावर टीका सुरु झाली असती, असेही राहुलने स्पष्ट केले.