पुणे – क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस तळागाळापर्यंत जात आहे याचा प्रत्यत पुण्यातही आला. स्वरा गुरव नावाची केवळ सहा वर्षांची मुलगी ज्या तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करताना दिसते त्याची दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनीही घेतली आहे.
स्वरा एका छोट्या घरात आपल्या भावांसह क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाला आणि काही तासांतच त्याला हजारो लोकांनी लाइक केले. त्यात न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक व आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे सल्लागार माइक हेसन यांनी स्वराचे कौतुक केले आहे.
या व्हिडीओने स्वराला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. हेसन यांनी तर एक पाऊल पुढे टाकताना हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला व त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक देशांच्या प्रशिक्षकांनी लाइक केले.
Remember the name 😊 #SwaraGurav https://t.co/TzbxRXPcuN
— Mike Hesson (@CoachHesson) April 25, 2020
एका इतक्या छोट्या मुलीचे कनेक्ट, चेंडूच्या टप्प्यापर्यंत येणारे पाय, डोक्याची पोझिशन व इम्प्रोव्हायझेशन पाहून भल्या भल्या खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे. स्वराची गुणवत्ता पाहून तिने सराव कायम ठेवला तर 15 वर्षांच्या आतच ही मुलगी चांगल्या दर्जाचे क्रिकेट खेळताना दिसेल असा विश्वास हेसन यांनी व्यक्त केला आहे.
न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू ग्रॅंट इलियट याने देखील हेसन यांनी पाठविलेला व्हिडीओ त्याच्या समुहात पाठवला व ही मुलगी अफाट गुणवत्ता घेऊन जन्माला आली आहे. येत्या काळात ती ज्युनिअर संघातून खेळताना दिसली तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
मितालीकडूनही कौतुक…
भारताच्या महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने देखील स्वराची फलंदाजी पाहून तिचे कौतुक केले आहे. असाच सराव कर, क्रिकेटपासून दूर जाऊ नको. तुझी कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी आणखी मेहनत कर, असा सल्लाही मितालीने दिला आहे.