नांदेड : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यात आज सकाळी नांदेड शहरात आणखी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.पंजाबमध्ये यात्रेकरूंना सोडून आलेल्या चार वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली असताना आता थेट लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात कार्यरत असणाऱ्या २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, शहरातील २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गुरुद्वारा व लंगर साहिब परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसात पाठवलेल्या ६० नमुण्यापैकी आज सकाळी २० नमुने आले पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरित अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यात्रेकरूंना सोडून आलेले वाहनचालक कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने उशिरा का होईना लंगर साहिबमधील वेगवेगळ्या लोकांचे दोन दिवसात जवळपास ९७ लोकांचे स्वाब घेतले होते. त्यापैकी २० लोक कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून सकाळपासून अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आणखी काही अहवाल येणे बाकी असून त्यात काही जण पॉझिटिव्ह आढळून आल्यास ती बाब नांदेडकरांना चिंतेत टाकणारी आहे.
या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना एनआरआय भवन कोविड केयर सेंटर येथे ठेवण्यात आले असून या भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.