हिंगोली: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये जिल्ह्यातील एसआरपीएफमधील मालेगाव येथे कार्यरत असलेल्या चार जवानांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हा अहवाल सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून प्राप्त झाला आहे. हे चार जवान एसआरपीएफ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईनमध्ये भरती होते. या सर्व चार जवानांचा पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. यापैकी तीन जवानांना 23 एप्रिल रोजी ताप, सर्दी, खोकला असल्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आली होते.
एका जवानाला 24 एप्रिल रोजी आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले होते. या चार जवानांचे थ्रोट स्वॅब अहवाल परत 25 एप्रिल रोजी घेण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. यात चारही जवानांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व जवानांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीला दिसून येत नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे करोना पॉझिटिव्ह 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील दहा जवान एसआरपीएफ हिंगोली, तर एक जवान एसआरपीएफ जालना येथील आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.