वडूज -करोनाविरोधातील लढाईत गावोगावी तैनात असलेल्या महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी वडूज, ता. खटाव येथील इन्स्टिट्युट ऑफ महा ई-लर्निंग अँड डिग्निटी स्किल डेव्हलपमेंट (आयएमडीएस) या संस्थेच्यावतीने सॅनिटरी पॅडस्चे खटाव तालुक्यातील एक हजार 300 व जिल्हा पोलीस दलातील 700 महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले.
आयएमडीएसचे संचालक अमोल शिंदे, अमित बोडके, पूजा गायकवाड, नितीन पाटील, निधी केंद्राच्या संचालिका संगीता खाडे, दत्तात्रय गोडसे उपस्थित होते. करोनाच्या विरोधातील लढाईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. यामध्ये महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. प्रशासनातील विविध विभागांमधील महिला अधिकारी, कर्मचारीदेखील अहोरात्र झटून काम करत आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी आयएमडीएसच्यावतीने महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटरी पॅडस्चे वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील 700 महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटरी पॅडस् देण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस निरीक्षक अशोक पाटील, पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर, अमोल शिंदे, नितीन पाटील उपस्थित होते.
याशिवाय वडूज येथील तहसील कार्यालय, पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, नगरपंचायतीच्या महिला सफाई कामगारांनाही सॅनिटरी पॅडस्चे वितरण करण्यात आले.
सॅनिटरी पॅडस्ची वैशिष्ट्ये
संस्थेच्यावतीने नैसर्गिकरित्या सॅनिटरी पॅडस् तयार करण्यात आली असून त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. महिलांना सुरक्षित वाटेल अशी कमी जाडीची, 290 मिमी लांबीची व विघटीत होणारे नॅपकीन पॅडस् आहेत. आयएमडीएसने “आय विन’ या ब्रॅंड नावाने पॅडस्चे उत्पादन केले आहे.