नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे देशभरात दुकानं, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारपासून देशभरातील दुकानं उघडण्याची सशर्त परवानगी दिली होती. परंतु कोणती दुकानं उघडी ठेवावीत, कोणती नाही याबाबत मात्र सर्वांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर शनिवारी सकाळी केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
As specified in the consolidated revised guidelines, these shops will not be permitted to open in areas, whether rural or urban, which are declared as containment zones by respective States/ UTs: Ministry of Home Affairs (MHA) https://t.co/SgfcRie8nP
— ANI (@ANI) April 25, 2020
गाव पातळीवर मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. परंतु कॅन्टोनमेंट झोन किंवा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी नसेल. तसेच शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील सर्व स्टँडअलोन शॉप्स, रहिवासी परिसरातील दुकानं आणि रेसिंडेन्सिअल कॉप्लेक्समधील दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तर बाजारपेठांमधील दुकानं मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. तसेच शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई असेल. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकांनांनाच सुट देण्यात आली आहे. तर देशातील मद्यविक्री ही बंदच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्य सरकार मात्र आपल्या अधिकारानुसार दुकाने सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. तसंच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच काम करणाऱ्यांना मास्क घालणं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.