चिमुरड्या मुलींनीही केली करोनावर मात
पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी येथील पुणे जिल्हा रुग्णालयातून आज करोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या चौघांना घरी सोडण्यात आले. महिला, तिचा दीर आणि महिलेच्या एक आणि आठ वर्षाच्या चिमुरड्या मुली करोनावर मात करीत आजारातून बऱ्या झाल्या. त्यामुळे रुग्णालयातील सर्वांनीच आनंद व्यक्त केला. चौघांना ऍम्ब्यूलन्समधून त्यांच्या मूळ गावी बारामतीला सोडण्यात आले. संबंधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, वैद्यकिय अधिकारी यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना शुभेच्छा देऊन निरोप दिला.
एकाच कुटुंबातील या चौघांना 7 तारखेला बारामती येथून पुणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रुग्णालयात त्यांच्यावर सलग 14 दिवस उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी केलेले उपचार आणि घेतलेली योग्य काळजी यामुळे चौघेही करोनामुक्त झाले.
21 तारखेला त्यांची पहिली चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. 22 तारखेला परत दुसऱ्यांदा त्यांची चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना आज सकाळी रूग्णालयातून ऍम्ब्युलन्सद्वारे बारामतीला सोडण्यात आले. करोनामुक्त झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदछटा झळकत होती. चौघा रुग्णांना 14 दिवस घरीच थांबावे लागणार आहे.