मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. आज (शुक्रवार) सचिनचा 47 वा वाढदिवस आहे. दरवर्षी निवडक लोकांच्या उपस्थितीत सचिन आपला वाढदिवस साजरा करतो यंदा मात्र, करोनाच्या धोक्यामुळे त्याने वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले आहे.
भारतासह जगभरात करोनाचा धोका कायम असल्याने संचारबंदी तसेच जमावबंदी आहे. देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊनही आहे. या सगळ्यामुळे दरवर्षीप्रमाणे वाढदिवसच काय तर अन्य सर्व कार्यक्रम करणे शक्य नाही. बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे म्हणूनच सचिनने वाढदिवस केवळ आपल्या घरातच अत्यंत साधेपणाने करण्याचे स्पष्ट केले.
लॉकडाऊनमुळे सचिनदेखील अन्य व्यक्तींप्रमाणे आपल्या परिवारासह घरातच आहे. त्याने करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 50 लाख रुपये दिले आहेत. त्याने गेल्या आठवड्यातच आपण 24 एप्रिलला येणारा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले होते.
लोकांसमोर प्रचंड संकट उभे अशा वेळी त्यांना मदत करणे त्यांच्या मनात सकारात्मकता आणणे महत्त्वाचे आहे. आपण सोहळे आयोजित करुन त्यांच्या समोर काय आदर्श ठेवणार आहोत. ज्यांना रोज दोनवेळच्या जेवणासाठीही जीवाचा अटापिटा करावा लागत आहे त्यांचे पोट भरणे आपले प्राधान्य असले पाहिजे, वाढदिवस काय पुढील वर्षीही साजरा करता येऊ शकेल असे सचिनने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.