मंचर/जुन्नर – करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने जो-तो आपल्या घरातच बसला आहे. मात्र, या करोनाचा गंध प्राण्यांना नसून मानव प्राणी त्यांना दिसत नसल्याने त्यांचा मानवी वस्तीत स्वच्छंद विहार सुरू आहे.
दरम्यान, जुन्नर तालुक्यासह आंबेगावात अनेक ठिकाणी बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच आहे. एकीकडी लॉकडाऊनमुळे शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कष्टाने पिकवलेली पिके डोळ्यादेखत सडत आहेत. तर दुसरीकडे बिबट्या पाळीव प्राणी फस्त करीत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
थोरांदळेत चार शेळ्यांचा फडशा
थोरांदळे (ता. आंबेगाव) येथील घुले मळ्यात बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला. ही घटना गुरुवारी (दि. 23) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
थोरांदळे येथील शेतकरी दत्तू विठ्ठल खेबडे यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यामध्ये एकूण सात शेळ्या त्यांनी नेहमीप्रमाणे बांधल्य होत्या. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोठ्याच्या भोवताली असलेली लोखंडी जाळी उचकटून बिबट्याने दोन शेळ्या जागेवरच ठार केल्या. व दोन शेळ्या ऊस आणि मक्याच्या शेतामध्ये पळवून नेल्या. पहाटे पाच वाजता दत्तू खेबडे यांच्या घडलेला प्रकार लक्षात आला. सोपान घुले यांनी वनविभागाला माहिती दिली.
वनपाल विजय वेलकर, वनरक्षक एस. एस. दहातोंडे, महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी उसाच्या व मक्याच्या शेतामध्ये पळवून नेलेल्या शेळ्यांचे अवशेष मिळाले नाहीत. तर घरासभोवताली शेतात बिबट्यांच्या पावलांचे ठसे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.