वाघोली (प्रतिनिधी) : कोरोना रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असून या कालावधीमध्ये राज्य व केंद्र सरकारने लॉक डाऊन जाहीर केले आहे. याच लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये नागरिकांनी घरी थांबण्याबाबतचे आवाहन सर्व स्तरातून केले जात आहे. पुण्यातील विशेष सरकारी वकील राजेश कातोरे यांनी फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना कायदेविषयक ज्ञान व सल्ला देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे .
दि. 19 एप्रिल पासून या उपक्रमाची कातोरे यांनी सुरुवात केली असून या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. घरगुती हिंसाचार पासून ते लॉक डाऊन च्या कालावधीमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा व शिक्षेचे स्वरूप आदींबाबत जनजागृती कातोरे करीत आहेत.
व्हाट्सअप च्या माध्यमातून अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींवर दाखल होणाऱ्या गुन्हे व त्यांच्या स्वरूपाची माहिती कातोरे देत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरीकांचा सुसंवाद वाढून नागरिकांना कायद्याचे ज्ञान व्हावे तसेच अपप्रचार, अपप्रवृत्ती यांना नागरिकांनी थारा देऊ नये यामागचा हेतू मनात ठेवून कातोरे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.