करोनाबाधितांत लहान मुलांची संख्याही लक्षणीय
पुणे – शहरात करोनाचे रुग्ण वाढत असतानाच या आजाराच्या सर्वाधिक विळख्यात युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका असून युवकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण कमी असले, तरी 50 वर्षांवरील व्यक्तींच्या मृत्यूची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. यातून ही बाब समोर आली आहे. तर त्यातही महिलांपेक्षा पुरुषांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही या आकडेवारीतून समोर आले आहे.
या आकडेवारीनुसार, 17 एप्रिलपर्यंत शहरात 501 जणांना करोनाची लागण झाली. त्यात 1 ते 80 वर्षांपर्यंत वय असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. यात सर्वाधिक रुग्ण 20 ते 50 वयोगटातील असून त्यांची संख्या तब्बल 191 आहे. यात 81 महिला असून, सुमारे 110 पुरुष आहेत. तर या वयोगटातील 14 जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यु झाला आहे.
त्याच वेळी 51 ते 80 वयोगटातील 129 जणांचा समावेश आहे. या सुमारे 71 पुरुष, तर 58 महिलांचा समावेश आहे. तर या वयोगटातील सुमारे 29 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लागण होण्याची संख्या कमी असली, तरी त्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका असल्याचे यातून समोर आले आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, 1 ते 10 वर्षे वयोगटातील 33 जणांना, 11 ते 20 वयोगटातील 37 जणांना करोनाची लागण झालेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही वयोगटातही पुरूषांपेक्षा महिलांना करोना होण्याचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.