वाल्हे (प्रतिनिधी) – कोरोनाच्या काळात दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी अहोरात्र झटणाऱे पोलिस व आरोग्य कर्मचारी यांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न पुढे येत आहेत . त्यामुळे वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर आज वाल्हे(ता.पुरंदर) येथील पोलिस दुरक्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका, महावितरण कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय येथील कर्मचाऱ्यांना सरपंच अमोल खवले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मिळणाऱ्या मानधनातुन त्यांनी सॅनिटायझर, मास्क वाटप करुन कृतज्ञता व्यक्त करुन वाढदिवस साजरा केला.
यावेळी पुणे जिल्हा बॅकेच माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते जेजुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने,तसेच वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे यांना, सॅनिटायझर, मास्क देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या कामाचे कौतुक करत, स्व:ताची काळजी घेण्याचा काळजीपोटी सल्ला दिला.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, “वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून, कोरोनाच्या लढ्यात नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी अहोरात्र योगदान देणा-या सर्वच कर्मचारी वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पोलिस प्रशासन, आरोग्य विभागाचे, तसेच महावितरचेही आभार मानले. तसेच सर्वच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपल्या घराबाहेर पडू नका, पोलिस प्राशासनाला सहकार्य करावे”,असे आवाहन पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच महादेव चव्हाण, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे, पोलिस कर्मचारी समिर हिरगुडे उपस्थित होते.