पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरीतील हिंदुस्थान ऍण्टीबायोटिक्स (एचए) कंपनीच्या ताब्यातील 87.7 एकर जागेचे मुल्यांकन राष्ट्रीय बांधकाम निर्माण महामंडळाकडून (एनबीसीसी) करण्यात येणार होते. मात्र लॉकडाउन सुरू असल्याने हे काम थांबविण्यात आले असून लॉकडाउन मागे घेतल्यानंतर संबंधित जमिनीची विक्री करण्यासाठी लिलाव केला जाणार आहे. या लिलावात खासगी क्षेत्रालाही संधी मिळू शकणार आहे.
कंपनीच्या संबंधित जागेबाबत यापूर्वी एक निविदा काढण्यात आली होती. ही जागा सरकारी संस्थेलाच विकण्याचे यापूर्वी नियोजन होते. त्यासाठी 2016 मध्ये परवानगी मिळाली होती. आता या जागेचे मुल्यांकन एनबीसीसी, एमएससीसी यांच्याकडून केले जात आहे. हे मुल्यांकन निश्चित झाल्यानंतर त्याची निविदा प्रक्रिया राबविली जाईल. या जागेसाठी सरकारी संस्थेबरोबरच खासगी संस्थेकडूनही निविदा आल्यास संबंधित संस्थांचा देखील त्याबाबत विचार केला जाऊ शकतो.
एच.ए. कंपनीला 1197 मध्ये आजारी उद्योग म्हणून घोषित करण्यात आले. केंद्र शासनाने कंपनीला वेळोवेळी मदत केली. या मदतीतून कामगारांना स्वेच्छानिवृत्तीची रक्कम देण्यात आली. तसेच, कामगारांचे थकीत पगार देण्यात आले. कंपनीची सध्याची परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या ताब्यातील 87.7 एकर जागेची विक्री करून रक्कम उभारली जाणार आहे.