टाकळी ढोकेश्वर – सोशल मीडियावर करोना आजाराविषयी खोटी माहिती पसरविणाऱ्या ग्रुप ऍडमिनसह तिघांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
करोना व्हायरस देशभरात थैमान घातल आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच या कालावधीत कुणीही सोशल मीडियावरून खोटी माहिती प्रसारित करणार नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढलेले आहेत. असे असतानाही सोशल मीडियावरून खोटी माहिती पसरविणाऱ्या पारनेर तालुक्यातील तिघांवर पारनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत पो. कॉ. बी. बी. दिवटे यांनी फिर्याद दिली आहे.
पारनेर तालुक्यातील नांदूरपठार येथील दत्ताभाऊ फ्रेंड सर्कल या व्हॉट्स ऍप ग्रुपवर रविवारी (दि.5) गारगुंडी, अक्कलवाडी, वडगावदर्या, पिंपळगाव रोठा परिसरात एक करोनाबाधित व्यक्ती फिरत आहे. तो जवळ येऊन मला पाणी द्या किंवा आजच्या रात्री राहू द्या असे म्हणत जवळ येत अंगावर थुंकत आहे, असा मेसेज पाठवून जनतेत भीती पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यामुळे पोस्ट टाकणारे मनोज तान्हाजी जगताप (रा. पिंपळगाव रोठा), किरण सुभाष बोंटे (रा. नांदूरपठार) व ग्रुप ऍडमिन दत्तात्रय भाऊसाहेब आग्रे (रा. नांदूरपठार, ता. पारनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेरचे स. पो. नि. राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हेड. कॉ. रोहिदास शेलार करत आहेत.