मंचर -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या कांदा लिलावाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी (दि. 1) 143 ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. सुमारे 121 ते 160 रुपये दहा किलोला बाजारभाव मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील सुमारे 50 गावांतील शेतकरी कांदा काढणी झाल्यानंतर लोणी येथील उपबाजारात कांदा लिलावासाठी घेऊन येतात. आठ ते दहा व्यापारी कांदा खरेदी करतात. बाजारात कांद्याचा कडता कापला जात नाही.
इलेक्ट्रॉनिक वजन काट्याने कांद्याचे वजन केले जाते आणि चोवीस तासांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शनिवारी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत कांद्याचे लिलाव होतात.
121 ते 160 रुपये दहा किलोला बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहे. बाजार समितीचे कामकाज पारदर्शक असल्याचे निकम यांनी सांगितले.