नायगाव- पुरंदर तालुक्यातील रिसे ग्रामपंचायतीच्या वतीने गावात वर्दळीच्या ठिकाणी करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी निर्जंतुकीसाठी औषध फवारणी करण्यात आली. वर्दळीची ठिकाणे, मुख्य चौक, मुकाई मंदिर परिसर, भैरवनाथ मंदिर परिसर, रस्ते, गावाजवळून जाणारा मार्ग, किराणा दुकान, रेशन दुकान, ग्रामपंचायत कार्यालय परिसर आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
युवकांनी फवारणीसाठी मेहनत घेतली. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आरोग्य विभागाचे अधिकारी व युवक उपस्थित होते. नागरिकांच्या घरासमोर असणाऱ्या शोष खड्डा व सांडपाण्याच्या टाकीभोवती औषध फवारणी करण्यात आली. गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडली तर इतर सर्व दुकाने बंद होती. गावाजवळून जाणाऱ्या सासवड- सुपे रोडवर शुकशुकाट पाहवयास मिळाला.