नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील भाजीपाला व शेतीमालाच्या गाड्या मुंबई पुणे येथे आज (दि. 2) पासून बाहेर जाण्यासाठी व बाहेरून गाड्या तालुका येण्यासाठी बंद केल्या आहेत.
अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दूध, किराणा मेडिकल या सुविधा नागरिकांना घरपोच दिल्या जातील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन करीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय (दि. 1) नारायणगाव येथे झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
आमदार बेनके यांनी नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण जुन्नर तालुका शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा व विविध उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक आयोजित केली होती.
बैठकीत माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके, सभापती विशाल तांबे, जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, गटविकास अधिकारी विकास दांगट उपस्थित होते.
करोना व्हायरसमुळे मुंबई शहरातील संशयित रुग्ण जुन्नर तालुक्यात आढळल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी नागरिकांच्या आरोग्य व हितासाठी कठोर निर्णय घेण्याचा निर्णय या बैठकीत घेतला आहे.
बैठकीत जुन्नर तालुक्यातील एकही शेतीमालाची गाडी तालुक्याबाहेर जाणार नाही.बाहेरूनही तालुक्यात येणार नाही. सर्व शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्रीही तालुक्यातच करावी, शेतीसाठी शेतमजुरांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या गावात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
छुपी वाहतूक रोखण्यासाठी कार्यवाही
शासनाने जाहीर केलेल्या रेशनकार्डवर रेशन कार्ड मिळणारे धान्य येत्या काही दिवसांतच वाटप सुरू करणार आहेत. रेशनकार्ड नाही अशा नागरिकांची लिस्ट स्थानिक तलाठी यांच्याकडून अधिकृत करून ती रेशन दुकानदारांना दिल्यास त्यांनाही ही धान्य मिळणार आहे.
अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी किराणा, दूध भाजीपाला या गाड्यांना देण्यात आलेले पास मंचर जुन्नर विभागाचे प्रांत यांनी रद्द केले आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक करण्यासाठी लागणारे पास हे ग्रामपंचायत सरपंच किंवा जुन्नर तहसील कार्यालयातून घेऊन नंतरच वाहतूक करावी.
अगोदर सर्व पास हे रद्द केले आहेत. मुंबई, पुणे येथे भाजीपाला, दूध घेऊन जाणाऱ्या वाहनांमध्ये शहरातील नागरिक छुप्या पद्धतीने तालुक्यात येत आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय तालुक्याच्या हितासाठी घेतला आहे, असे बेनके यांनी सांगितले.