पारनेर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. त्यांच्या मदतीला आ. नीलेश लंके धावले असून, त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात अशा गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. या गरजूंना दररोज जेवण दिले जाणार आहे.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी असतानाही आ. लंके गावोगावी फिरून गरजूंना मदत करत आहेत. तसेच स्वतःच्या पाठीवर जंतुनाशकाचा पंप घेऊन फवारणीही करत आहेत. विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच ग्रामीण रुग्णालयांना भेटी देऊन आपत्ती प्रसंगी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी तत्परतेने काम करण्याच्या सूचना देत आहेत. गावोगावी फिरत असताना अनेक गोरगरिबांची उपासमार होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तत्काळ आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधून नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून मतदार संघातील एकही नागरिक उपाशी राहाणार नाही. याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.
प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदाम पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, विक्रम कळमकर, दादा शिंदे, ऍड. राहुल झावरे, विजय औटी, बापू शिर्के, अरुण पवार यांनी गावनिहाय गरजूंच्या याद्या तयार करून त्यांना दररोज दोन वेळेसचे जेवण पोहच करण्याचे नियोजन केले आहे.