वाघळवाडी – बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये करोना रोगाची संसर्गाची परवा न करता आणि संचारबंदी न जुमानता अनेक लोक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत.
अशा विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर बुधवार (दि. 1) पासून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांतर्गत ड्रोनद्वारे नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. वाघळवाडी, सोमेश्वरनगर, करंजेपूल, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे आदी गावांवर ड्रोनची करडी नजर राहणार आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांना पकडता पकडता आणि समजून सांगता सांगता प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पाडणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनची मदत पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली आहे.
जिल्हा अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रशासनाने वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांवर ड्रोनद्वारे आता करडी नजर राहणार आहे.
विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर ड्रोनची नजर राहणारा असून या चित्रीकरणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी उपयोग केला जाणारा असल्याचे सोमनाथ लांडे यांनी सांगितले.
सोमेश्वरनगर परिसरात 10 दुचाकी जप्त
अनेकदा सांगून झाल्यानंतर, पोकळ बांबूचे फटके दिले तरी देखील मोकाट फिरणाऱ्यांचा आकडा कमी होत नाही हे पाहून वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत रस्त्यावर विनाकारण फिरून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 10 दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.वाघळवाडी, कन्नडवस्ती, मोरगाव, चोपडज, सुपे या ठिकाणी दोन दिवसांत या 10 जणांवर कारवाई करण्यात आली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.