पुणे – मार्केट यार्डातील फुलबाजार येत्या 15 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल फुलबाजार आडते असोसिएशन आणि बाजार समिती प्रशासनामध्ये झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेतला आहे. पुणेकरांना आता फुले खरेदी करण्यासाठी 16 एप्रिलची वाट पहावी लागणार आहे.
फुलबाजार कमी जागेत जास्त व्यापार होतो. येथे खरेदीसाठी नेहमी मोठी गर्दी होत असते. तसेच, फुलेही जीवनावश्यक गोष्टींमध्ये येत नाहीत. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय झाल्याचे अखिल फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.
ते म्हणाले, यापूर्वीच 31 मार्चपर्यंत फुलबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद लांबविण्याचा निर्णय झाला आहे. सध्या परिस्थितीत दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि पदार्थांनाच नागरिकांकडून मागणी आहे. त्यामुळे फुल बाजारात फुलांनाही फारशी मागणी असण्याची शक्यता नाही. त्यामुळे बाजार समितीशी झालेल्या चर्चेमध्ये एकमताने या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.