देशभरातील एकूण 564 उत्पादकांचा उत्पादनात सहभाग
पुणे – देशभरातील 45 गाळप कारखाने आणि 564 इतर उत्पादक यांना हॅन्ड सॅनिटायझर्सच्या उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. तर, 55 पेक्षा अधिक गाळप यंत्रणांना येत्या एक-दोन दिवसांत ही परवानगी दिली जाणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत आणखी जास्त कारखान्यांना हॅन्ड सॅनिटायझर्सच्या उत्पादनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यातील बहुसंख्य उत्पादकांनी उत्पादन सुरू केले आहे तर, इतर काही येत्या आठवडाभरात उत्पादन सुरू करतील. त्यामुळे ग्राहक तसेच रुग्णालयांना हॅन्ड सॅनिटायझर्सचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहणार आहे.
करोना विषाणूशी लढण्यासाठी असलेल्या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. करोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी नागरिक, आरोग्यसेवक, रुग्णालय इत्यादींमध्ये हॅन्ड सॅनिटायझर्स वापरले जात आहेत. त्यामुळे हॅन्ड सॅनिटायझर्सच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मागणीनुसार पुरवठा व्हावा म्हणून महसूल आयुक्त, साखर आयुक्त आणि औषधनियंत्रक या राज्य सरकारच्या यंत्रणा तसेच विविध राज्यांचे जिल्हाधिकारी यांनी हॅन्ड सॅनिटायझर्स उत्पादकांना इथेनॉलचा पुरवठा होण्याबाबतच्या सर्व अडचणी दूर करण्यास तसेच सर्व अर्जदार आणि हॅन्ड सॅनिटायझर्सचे उत्पादन करू शकणाऱ्या ऊस गाळप कारखान्यांना त्यासाठी परवानग्या देण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. जे साखर कारखाने हॅन्ड सॅनिटायझर्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकत असतील त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याची योजना आहे. अशा कारखान्यांना उत्पादन वाढवण्यासाठी तीन पाळ्यांमध्ये काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सर्वसामान्य नागरिक आणि रुग्णालयांना हे हॅन्ड सॅनिटायझर्स योग्य किमतीत मिळावे, यासाठी सरकारने त्यांची एमआरपी म्हणजे जास्तीत जास्त किरकोळ किंमत निश्चित केली आहे. हॅन्ड सॅनिटायझर्सच्या 200 मि.ली. बाटलीची किरकोळ किंमत 100 रुपयांपेक्षा जास्त असणार नाही, याच आधारे हॅन्ड सॅनिटायझर्सच्या इतर प्रमाणातील किंमती निश्चित केल्या जाणार आहेत.