नागरिकांनी वस्तूंचा साठा करू नये
महर्षिनगर/पुणे : करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील 21 दिवस देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली असली जिवनाश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांची घाबरून जाऊ नये.याच पार्श्वभूमीवर मार्केटयार्डातील भुसार बाजार सुद्धा येत्या शुक्रवार पासून नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याची माहिती पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.
देशात आता लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांमध्ये भिती आहे.त्यामुळे नागरिक जास्त माल खरेदी करत आहेत.त्यामुळे रिटेल विक्री करणाऱ्या किराणा दुकानांमधील माल संपत आहे.अशा वेळी जादा दराने माल सुद्धा विकण्याची शक्यता आहे.असे प्रकार होऊ नये म्हणून आज दुपारी पुणे मर्चंट चेंबरच्या कार्यकारीणीची तातडीने बैठक घेण्यात आली.या बैठकीत भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भुसार बाजार बंद ठेवला तरी मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होऊन या भुसार बाजारात हातावर पोट असणारे अनेक मजूर आहेत त्यामुळे या मजूरांच उपासमार होईल.त्याचबरोबर शहर आणि जिल्ह्यात जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होईल.त्यामुळे बाजारात दर ही वाढतील यामुळेच भुसार बाजार तातडीने सुरू करण्याची मागणी या बैठकीत व्यापाऱ्यांनी केली.
मार्केट यार्ड भुसार बाजारात काही वेळ ठरवून त्या वेळेत फक्त सुरू ठेवावा, जिवनाशयक वस्तू ची दुकाने सुरू होणे गरजेचे आहे हमाली करणाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करणे गरजेचे आहे, जीवनाश्यक वस्तूंची विक्री करताना पोलिसांनी चर्चा करून नियम ठरवावे व सहकार्य करावे अशी भुमिका ज्येष्ठ व्यापारी अभय संचेती यांनी मांडली.
त्याचवेळी पोलिस कुठल्याही प्रकारे अडवणूक करणार नाही ना याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी तसेच कुठल्याही व्यापाऱ्याला तसेच त्याच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना सुध्दा संरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका सुद्धा बैठकीत मांडण्यात आली.त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती व पोलिस प्रशासनाशी सुद्धा चर्चा करण्यात आली.या चर्चेनंतर अखेर शुक्रवारपासून नियमितपणे भूसार बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात अधिक माहिती देताना पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले,भुसार बाजार सुरू करण्याबाबत आमची बैठक झाली आहे.त्याप्रमाण पोलिसांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.त्याचबरोबर आमच्या सर्व व्यापाऱ्यांना ओळखपत्र सुद्धा देण्यात येणार आहेत.याशिवाय शंभर पोलिसांची स्वतंत्र कुमक सुद्धा देण्याचे मान्य केले आहे.त्यामुळे आता आम्ही येत्या शुक्रवारपासून(27 मार्च) भूसार बाजार नियमितपणे सुरू राहणार आहे.