यापूर्वी परवानगी दिली असल्यास रद्द
पुणे – करोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी दिली असल्यास, ती परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.
राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढले आहेत. गर्दीच्या ठिकाणी करोना विषाणूचा प्रादुर्भाव जलदगतीने होऊ शकतो. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहणे टाळावे.
शहरात गर्दी होईल, असे कार्यक्रम करण्यास त्यामुळे बंदी घालण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक आणि अन्य स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
शासकीय आणि खासगी कार्यक्रमांवर जिल्हा प्रशासनाने बंदी आणली असताना, रविवारी हडपसर येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यावर संयोजकांवर कारवाई करणार का, असे जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता, ते म्हणाले, “याबाबतची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. असे कार्यक्रम कोणीही घेऊ नयेत.’