झेडपीकडून घरकुलाच्या दुरुस्तीसाठी मदत; काम अंतिम टप्प्यात : लाभधारक सुखावले
गतवर्षी गारपीट व चक्रीवादळाने वाडीतील घरे उद्ध्वस्त
बेल्हे (वार्ताहर) – जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने महिलांसाठी घरकुल दुरुस्ती योजनेअंतर्गत शिंदेवाडी येथील 14 कुटुंबाला प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत शासनाने केली आहे. सध्या गावात घर दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकर पूर्ण होणार आहेत. यासाठी माजी सरपंच रोहिदास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी जिल्हा परिषदेकडे सतत पाठपुरावा करून प्रत्येकाला घरकुल दुरुस्ती अंतर्गत 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करून देण्यासाठी सहकार्य केले आहे.
शासनाने दिलेली मदत तोकडी असली तरी घर पुन्हा दुरुस्त होताना पाहून नागरिक सुखावले आहेत.
गेल्यावर्षी भीषण दुष्काळ होरपळलेल्या जुन्नर तालुक्यातील शिंदेवाडीत दि. 10 जून 2019 मध्ये चक्रीवादळ आणि गारपिटीचा सामना करावा लागला. येथील 14 कुटुंब वादळाने उद्ध्वस्त झाली होती. घराचे छप्पर उडाल्याने घरातील सर्व अन्नधान्य व इतर साहित्य पावसाने भिजून गेले होते. त्यांना राहायला घर राहिले नव्हते. हे 14 कुटुंब आता उघड्यावर पडले होते. या पावसाने गावातील चारा छावणी, विजेचे पोल, शाळा, मंदिर, मज्जीद, आदी मालमत्ता बाधित झाल्या होत्या.
शोभा कडुसकर, पुष्पावती क्षीरसागर, शबरी शेख, शांताबाई शिंदे, रंजना शिंदे, झुंबर शिंदे, सुमन शिंदे, मीराबाई कडुसकर, लतीफा शेख, वैशाली शिंदे, सुंदराबाई काळे, सविता शिंदे, यमुनाबाई शिंदे, इंदुबाई कडुसकर या चौदा महिलांना लाभ झाला आहे. घरातील ऍगल, पत्रे टाकून घराच्या पडलेल्या भिंती बांधून झाले आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले आहेत. यावेळी गावचे माजी सरपंच रोहिदास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,सामाजिक कार्यकर्ते अमोल शिंदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे लाभार्थ्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे.