जिनपिंग यांनी केली वुहान प्रांतातील स्थितीची पहाणी
रोम – मंगळवारी जगभरात करोनाची लागण झाल्यामुळे मृतांची संख्या 4,000 च्या पुढे गेली. इटालियन सरकारने, अभूतपूर्व पाऊल म्हणून, करोना विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी संपूर्ण देशात वैयक्तिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. इटलीमध्ये 9,000 पेक्षा जास्त जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि 463 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर अमेरिकेमध्ये 700 जणांपेक्षा अधिक जणांना करोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
चीनमधे करोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या वूहान प्रांताला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज पहिल्यांदाच भेट दिली. जिनपिंग यांनी करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी वूहानची राजधानी हुबेई इथे सुरु असलेल्या नियंत्रण कक्षाची आणि इतर उपाययोजनांची पाहणी केली.
दरम्यान, चीनमधे गेल्या चोवीस तासात कोरोना विषाणूमुळे 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तिथल्या आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे एकट्या चीनमधल्या मृतांची संख्या तीन हजार 136 इतकी झाली आहे, तर 80 हजार 754 करोनाचे संशयित रुग्ण आहेत. सुमारे 17 हजार 721 जणांवर उपचार सुरू असून, 59 हजार 897 रुग्णांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पंतप्रधानांचा बांगलादेशचा दौरा पुढे ढकलला
बांगलादेशाचे संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचा येत्या 17 तारखेला टाका इथे आयोजित उद्धाटन सोहळा, करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलला आहे. हा सोहळा कधी होणार हे नंतर जाहीर केले जाणार आहे. बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढल्या आठवड्यात बांगलादेशाला भेट देणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याची औपचारिक अधिसूचना बांगलादेश सरकारने पाठवली असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली आहे.
करोनाचे रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथींच्या रोगात
करोनाचा संसर्ग सुमारे 100 देशांमध्ये पसरल्याने, या साथीचे रुपांतर आता सर्वव्यापी जागतिक साथीच्या रोगात झाल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेचे व्यक्त केलं आहे. कोरोनाबाधित राष्ट्रांमधल्या सरकारांनी, संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी जागरुकपणे लढा दिल्याने रोगाचा संसर्ग नियंत्रित स्वरुपात राहिल्याचे जगाच्या इतिहासातले हे एकमेव उदाहरण असेल, असे डब्ल्यू.एच.ओचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसेयस यांनी म्हटले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या या संसर्गाने 3 हजार 817 बळी घेतले आहेत, तर 1 लाख दहा हजार 29 संशयित रुग्ण आहेत.