भाजपच्या सदस्याने दिला शिवसेनेला पाठिंबा
नगर – भिंगार कॅन्टोन्मेंटच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रकाश फुलारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज उपाध्यक्ष निवडीसाठी ब्रिगेडिअर विजयसिंग राणा, नगर छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी विद्याधर पवार यांच्या उपस्थितीत सदस्यांची उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. छावणी परिषदेचे एकूण सात सदस्य आहेत.
यामध्ये शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादीचे तीन, तसेच भाजपचा एक सदस्य आहे. आज झालेल्या निवड प्रक्रियेत उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे फुलारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केली. यावेळी भाजपच्या शुभांगी साठे यांनी फुलारी यांना पाठिंबा दर्शविल्याने त्यांचे पारडे जड होते. त्यामुळे राष्ट्रवादीतर्फे एकाही सदस्याने अर्ज दाखल केला नाही. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत फुलारी यांचा एकच अर्ज आला. त्यामुळे फुलारी यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. यावेळी ब्रिगेडिअर विजयसिंग राणा यांनी प्रकाश फुलारी यांना निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी माजी आमदार अनिल राठोड, भाजपचे ऍड. अभय आगरकर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष मुकुल गंधे, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे, भिंगार शहराध्यक्ष वसंत राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, दामोदर माखिजा, कॅंटोन्मेंट सदस्य रवींद्र लालबोंद्रे, संजय छजलानी, शुभांगी साठे यांच्यासह शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोश केला.
भाजपमुळेच हुकली होती संधी
पाच वर्षांपूर्वी शिवसेनेतर्फे प्रकाश फुलारी यांना उपाध्यक्षपदाचा उमेदवार करण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या शुभांगी साठे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार साथ दिल्याने फुलारी यांची उपाध्यक्षपदाची संधी हुकली होती. त्यामुळे ते नाराज होते. यावेळी मात्र भाजपच्या साठे यांनी फुलारी यांना पाठिंबा दर्शविल्याने त्यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली. पूर्वी भाजपमुळेच संधी हुकली होती. यावेळी मात्र भाजपमुळेच त्यांना उपाध्यक्ष होण्याचा मान मिळाला.